कोविडची सौम्य लक्षणे असणार्यांना दिलासा! आता निःशुल्क होतील कोरोना उपचार : जिल्हाधिकारी भीमनवार

वर्धा : महाराष्ट्रामधील सर्व नागरीकांसाठी वीस पॅकेजेस या योजनेंतर्गत कोविड – १९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणार्‍या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रुग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा यासाठी ७०० रुपये प्रति दिवस खर्च ठरविण्यात आला होता. परंतु, आता कोरोना उपचारासाठी रुग्णांकडून शुल्क घेतले जाणार नाही. असा महत्वपूर्ण आदेश मंगळवार (ता. ८) रोजी फेसबुकच्या आभासी पटालावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोविड-१९ महामारी सदृश्यस्थिती असल्याने बरेचसे कोरोना रुग्ण कस्तुरबा गांधी हॉस्पीटल, सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे भरती करण्यात येतात. राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यातील सेवाग्राम आणि सावंगी ही दोन्ही रुग्णालये ही योजना राबविण्यास पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्याकरीता उत्पन्नांची कोणतीही अट नाही केवळ नागरिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापी, कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रुग्णासंदर्भात आकारण्यात येणारा खर्च हा संबंधित रुग्णांकडून घेतला जातो.
यासाठी जिल्ह्यात असे लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्रति दिवस ७०० रुपये दर ठरविण्यात आले होते.

मात्र, शासनाने रुग्णांवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी अवलंबिलेल्या धोरणांतर्गत रुग्णालयाला जेवण, तपासणी, औषधी, उपचार, इत्यादी सुविधासाठी आपत्ती व्यवस्थापन मधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सेवाग्राम व सावंगी मेघे हे दोन्ही रुग्णालयांना शासकीय कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहित केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या रुणालयातील कोरोना उपचारासंदर्भात सर्व खर्च भागविण्यासंदर्भात राज्य शासनाचे निर्देश आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत येणार्‍या पॅकेजेस मध्ये ज्या कोरोना बाधित रुग्णांना लाभ मिळू शकत नाही, त्या रुग्णांकरिता शासकीय दरानुसार रुग्णावर झालेला खर्च आता जिल्हा शासन देईल. शासकीय दराप्रमाणे यामध्ये जेवण, औषधी व इतर उपचार यांचा समावेश राहील. दोन्ही रुग्णालयाने रुग्णांकडून उपचार, औषधी व तपासणीकरिता कोणताही शुल्क आकारू नये, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.
परंतु, खाजगी खोली मधील रुग्णांकरिता व वर्धा जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांकरिता तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र रुग्णांकरीता सदर निधी मिळणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here