राणे रुग्णालयात प्रसूताच्या मृत्यूने तणाव! वर्धेच्या चमूने केले शवविच्छेदन

आर्वी : येथील राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकडून करीत तशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. गौरी अभिजीत डवरे (२८) रा. नेताजी वॉर्ड असे महिलेचे नाव आहे.

शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता शनिवारी ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजेश कुटे, नायब तहसीलदार विनायक मगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल देवकाते, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल गौरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आर्वी येथील राणे हॉस्पिटल येथे गौरी अभिजीत डवरे हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सिझर करण्यात आले. गौरी हिने गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, गौरी हिला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने व ते गौरीचा पती अभिजित याच्या निदर्शनास असल्याने त्यांनी याची माहिती नर्सला दिली. नर्सने याची माहिती डॉ. कालिंदी राणे यांना दिली. परंतु, दीड तासांचा कालावधी लोटूनही डॉक्टर आले नाहीत. अशातच गौरीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. याला डॉक्टर जबाबदार असल्याचे गौरीचे कुटुंबिय म्हणतात.

अन् हलविले उपजिल्हा रुग्णालयात

रात्री १० वाजताच्या सुमारास गौरीची प्रकृती खालवल्याने तिला सुरुवातीला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, रक्त उपलब्ध नसल्याने वर्धा येथील जिल्हा रुग्णालयातून रक्ताच्या दोन बाटल्या बोलावण्यात आल्या. परंतु, तत्पूर्वीच गौरीचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी व्यक्त केला प्रचंड रोष

गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी एकच रोष व्यक्त केल्याने रुग्णालय प्रशासनात चांगलाच गोंधळ उडाला होता. गौरीच्या कुटुंबीयांनी या दु:खाच्या प्रसंगी स्वत:ला कसेबसे सावरत आर्वी पोलिसात तक्रार नोंदविली.

डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शनिवारी दिवसभर राणे हॉस्पिटल समोर पोलिसांचा बंदोबस्त होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आर्वीच्या ठाणेदारांना भेटून अभिजित डवरे, नगरसेवक रामू राठी, गौरव जाजू, छोटू शर्मा आदींनी केली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here