

देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात प्रा. लि. (महालक्ष्मी स्टील कारखाना) या कंपनी परिसरात देवळीतील काही व्यक्तींनी येत कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी रमेशचंद्र नाथ यांच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, २६ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दहा ते बारा व्यक्तींनी महालक्ष्मी कंपनीत अनधिकृत प्रवेश करुन क्षुल्लक कारणावरून वाद करून कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही. तर त्यांनी कंपनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी तक्रारीवरून किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, महेश जोशी, वैभव नगराळे, इरफान शेख, परवेज पटेल आदींवर भादंविच्या कलम १४३, १७७, १४९, २९४, ४४७, ४२७ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे करीत आहेत. कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले ते युवा संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे समजते.