डॉ. पंजाबराव देशमुरव व्याज सवलत योजना! मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या ७ हजार शेतकऱ्यांना १ कोटी ७३ लाखांची व्याज सवलत; जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

वर्धा : शेतकऱ्यांना अधिकाअधिक पीक उत्पादन घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या. योजनेअंतर्गत मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजावर सवलत दिली जाते. जिल्ह्यात गेल्या हंगामातील ७ हजार शेतकऱ्यांना १ कोटी ७३ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पीक प्रोत्साहन व व्याज दरात सवलत देऊन आर्थिक साहाय्य करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. योजने अंतर्गत सहकारी पतपुरवठा संस्था, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बॅंका व खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेल्या व मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर व्याजात सवलत दिली जाते.

१ लाखापर्यंत अल्प मुदतीचे पिककर्ज घेतल्यास ३ टक्के तर ३ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास १ टक्के व्याज सवलत देण्यात येते. शेतकऱ्यांनी व्याज सवलतीसाठी कर्जाची उचल १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत केलेली असणे आवश्यक आहे. पुढील वर्षी ३० जूनपर्यंत म्हणजे मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत दिली जाते. व्याजाची रक्‍कम शासनाच्यावतीने परस्पर बँकांना दिली जाते. जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात ७ हजार शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड करुन व्याज सवलतीचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांना व्याज सवलतीपोटी १ कोटी ७३ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here