
वर्धा : आर्वी येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कारचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात १३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाढोणा मार्गावरील सावळापूर शिवारात झाला. सर्व जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुनील हरिराम राडे (४५), विवेक बुटले (६५), आर्यन सुनील राडे वय (६ महिने), रिया विवेक बुटले (२५), परमेश्वरी सुनील राडे (४५) सर्व रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे. राडे कुटुंबीय आर्वी येथून कार्यक्रम आटोपून एम.एच. ३४ बी. व्ही. ७८७९ क्रमांकाच्या कारने चंद्रपूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने सावळापूर शिवारात असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलाखाली कोसळली. यात कारमधील सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. पुढील तपास आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.


















































