

राहुल खोब्रागडे
मुंबई : पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास एक टक्का व्याजदरासह आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्का व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याजदर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हींचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज शून्य टक्का व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत, १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १ टक्का व्याजदरात सवलत देण्यात येत होती.
आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीककर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीककर्ज (शून्य) टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीककर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.