
पवनार : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध धंदेवाल्यांना वचक बसावा म्हणून आज पवनार गावात सेवाग्राम पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला. पोलिसांच्या दमदार संचलनामुळे गावात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला गेला आहे.
हा रूट मार्च सेवाग्राम पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यामध्ये २ अधिकारी, २ पोलीस उपनिरीक्षक, २१ अंमलदार आणि २० होमगार्ड सहभागी झाले होते. रूट मार्चची सुरुवात बस स्टॉप चौकातून झाली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्ग, गल्लीबोळ, बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी फेरी मारली व थेट गणपती विसर्जन नदी परिसरातून या रूट मार्चची सांगता झाली.
शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. गावातील बाजारपेठेत व गल्लीबोळात अवैध दारू व जुगार यांसारख्या धंद्यांवर पोलिसांनी आपली नजर ठेवल्याचा स्पष्ट संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. पोलिसांच्या या दमदार उपस्थितीमुळे गावातील वातावरण सुशोभित झाले असून आगामी उत्सव शांततेत आणि सामंजस्यपूर्ण वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.





















































