
वर्धा : अवैधरित्या नदीपात्रातून रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यात एक जॉनडियर कंपनीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
आज रोजी अल्लीपूर रोडवर अपघात झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी अल्लीपूर हायवे रोडवर नाकाबंदी केली होती. अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस पथक कारवाई करीत असताना, तळेगाव टाळतुले गावाच्या दिशेने एक बिना नंबरचे ट्रॅक्टर वेगाने जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करून ट्रॅक्टर थांबवले असता त्यात नदीपात्रातून आणलेली ओली रेती असल्याचे आढळले.
वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन नंबर, रेतीची रॉयल्टी आदी कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी कोणतेही कागद दाखवले नाहीत. चौकशीअंती रेती ही तळेगाव टाळतुले ते भिवापूर रोडवरील नाल्यातून चोरी करून आणली असून विक्रीसाठी नेत होते, हे उघड झाले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल अल्लीपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पो.हवा. अजय शेंडे, पो.स्टे. अल्लीपूर करीत आहेत.


















































