ट्रॉलीखाली दबून ऊसतोड महिला मजुराचा मृत्यू! चार मजुरांसह तिघे बालके गंभीर

वर्धा : वळण रस्त्यावर उतार असल्याने ऊसतोड कामगार घेऊन जात असलेल्या ट्रॅक्‍टर अनियंत्रीत झाल्याने रस्त्याकडेला पलटी झाला. दरम्यान, ट्रॉलीखाली दबून सात मजूर गंभीर जखमी झाले, तर एका महिला मजुराचा मृत्यू झाला. हा अपघात पानवाडी शिवारात २७ रोजी सायंकाळच्या सुमारास झाला. खरांगणा पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रिताबाई सुंदर यादव (३५) रा. लहरपूर, ता. पुष्पगज, जि. अवपूर मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. तर सुंदर बुधसेन यादव (४०) रा. लहरपूर मध्यप्रदेश, लक्ष्मी विठुल ढंगारे (७५) रा. सेंदुरजना, जि. वाशिम, दुर्गा अमोल कुरकुटे (२२) रा. कारली, वैशाली संतोष वरकरे (०६) रा. भोसा, जि. यवतमाळ यांचा समावेश आहे. वैष्णवी अमोल कुरकुटे वय तीन महिने रा. कारवी, जि. यवतमाळ आणि पल्लवी अमोल कुरकुटे (०२) रा. कारली अशी जखमींची नावे आहे. सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुणणालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर चालक गुणवंता रामराव मुरखे (38) हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुणवंत रामराव मुरखे रा. बेलगाव हा दुपारच्या सुमारास कामठी येथे एम.एच. १३ टी. १७६६ क्रमांकाची ट्रॅक्‍टरमध्ये उस भरून व ट्रॉलीत ८ ऊसतोड पुरुष मजूर, चार महिला मजूर, तीन लहान मुली व १ मुलगा असे ट्रॅलीत बसवून खरांगणा मार्गे पानवाडी येथे जात होता. दुपारी 3 वाजताच्या सुमारास पानवाडी जावाजवळील घाटावरून वळण रस्त्याने उतारावरून भरधाव ट्रॅक्‍टर नेल्याने ट्रॅक्टर अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला, ट्रॅकटरला लागून असलेली ट्रॉली उलटल्याने ऊसतोड मजूर खाली पडले आणि ट्रॉलीखाली दबले. यात तीन बालकं आणि चार मजूर जखमी झाले. तर एका महिला मजुराचा मृत्यू झाला, ट्रॅक्टर चालकही गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here