
सेलू : नागपूरकडून सेलूकडे ट्रिपलसीट येणारी दुचाकी रस्त्यावर उभ्या बोलेरो वाहनाला मागाहून धडकल्याने दुचाकीवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात २९ रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास खडकी शिवारात झाला. जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पवन प्रभाकर चचाने (४५) रा. बेलगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. मंगेश सुरेश दुर्गे (२६), रमेश मारोती मंडाळी (४०) दोन्ही रा. धानोली मेघे अशी जखमींची नावे आहे. मृतक पवन आणि त्याचे दोन मित्र असे तिघे एम.एच. 3१ डी.आर. ९१४४ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर येथून सेलूकडे येत होते. दरम्यान, खडकी परिसरात उभी असलेले बोलेरो वाहन अंधारात चालकाला दिसून न आल्याने दुचाकी थेट बोलेरो वाहनावर जाऊन धडकली.
या अपघातात पवनचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मंदिर परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. अपघातस्थळी सिंदी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्ध्यातील सामान्य रुग्णालयात पाठविला.




















































