बर्थडे बॉय ला मित्रांनी कारमध्ये चोपले, नंतर घरापर्यंतही सोडून दिले! एका आरोपीस अटक

वर्धा : मित्राच्या वाढदिवशी त्याला कारमध्ये बसवून दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या मित्रांनीच ‘बर्थडे बॉय’ला लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने जबर मारहाण करून त्याच्या खिशातील दोन ते अडीच हजार रुपये जबरीने हिसकावून पुन्हा त्याला त्याच्या घरापर्यंत सोडून दिले. ही विचित्र घटना हिंगणघाट शहरात घडली. याप्रकरणी 30 रोजी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणात आरोपी ऋषीकेश रघाटाटे (रा. बिडकर वॉर्ड) याला अटक केली असून कारही पोलिसांनी जप्त केली. उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती दिली.

मोहित चंद्रशेखर फुलझेले (वय २३, रा. प्रज्ञानगर) याचा २९ रोजी वाढदिवस होता. तो रात्री ११ वाजताच्या सुमारास आंबेडकर शाळेसमोरील चौकात उभा असताना तेथे आरोपी ऋषीकेश रघाटाटे, रोहित गोदे, अभिषेक कुळसंगे हे कारने आले. त्यांनी तुझा वाढदिवस असल्याने तू आज आम्हाला दारू पाज,
असे म्हणत कारमध्ये बसण्यास सांगितले. मोहितने पहिला नकार दिला. मित्रांनी आग्रह केल्याने तो कारमध्ये बसला त्याला तिन्ही आरोपींनी हायवेवरील शिवाजी माकेट परिसरात असलेल्या पुलाखाली नेत कार थांबवून दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता तिघांनी मोहितला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, एकाने राॅडने मारहाण केली. झालेल्या झटापटीत मोहितचा मोबाईलही गाडीत पडला असून त्याचा दातही तुटला.

तिघांनी त्याच्या खिशातील दोन ते अडीच हजार बळजबरीने हिसकावून घेत त्याला पुन्हा त्याच्या घराजवळ रात्री १२ वाजताच्या सुमारास सोडून देत तेथून पळ काढला, मोहितने घडलेला सर्व प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. वडिलांनी मोहितला रुग्णालयात नेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ३१ रोजी पोलिसांनी यातील मुख्य आरोपी ऋषीकेश रघाटाटे याला अटक करून कार जप्त केल्याची माहिती दिली, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध असल्याचे हिंगणघाट पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here