
वर्धा : बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे लागवड केल्यास अधिकचा पाऊस किंवा पावसात खंड पडल्यास पिकांचे नुकसान होत नाही. उत्पन्न वाढीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. यावर्षी खरीप हंगामात 26 हजार शेतकऱ्यांनी 16 हजार हेक्टरवर या पध्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी या फायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
खरीप हंगामात पावसाचा दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीक वाढीसाठी अनुकूल गादी वाफे, बीबीएफ तयार करणे आणि त्यावर पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. बीबीएफमुळे पिकांची चांगली उगवण होते. कमी किंवा अधिक पावसाच्या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची बीबीएफद्वारे लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

















































