चौथा स्तंभ व पत्रकारिता पुरस्कार प्रदान! श्रमिक पत्रकार संघातर्फे वैद्य, राठी, गारघाटे, हुसेन, मुंजेवार पुरस्कृत

वर्धा : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणा-या चौथा स्तंभ व पत्रकारिता पुरस्कारांचे आज मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी अर्थात मराठी पत्रकारदिनी दादाजी धुनिवाले सभागृहात सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. उद्घाटक म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर होते. वर्धा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डाँ. राजेंद्र मुंढे, पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष इक्राम हुसैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांचे हस्ते शेतकर्यांचे आधारस्तंभ ठरलेले हिंगणघाट तालुक्यातील बेलघाट येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र वैद्य यांना चौथा स्तंभ सामाजिक पुरस्कार देण्यात आला. 5 हजार रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शॉल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ग्रामीण विभागातून स्व. प्रशांत हेलोंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार हिंगणघाट येथील पत्रकार विजय राठी आणि गिरड येथील पत्रकार गजानन गारघाटे यांना प्रदान करण्यात आला. शहरी विभागातून पत्रकार प्रा. डा’. प्रवीण वानखेडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार वर्धा येथील ज्येष्ठ पत्रकार इक्राम हुसेन शेख यांना, तर पत्रकार मनोज मुते स्मृती पत्रकारिता पुरस्कार वर्धा येथील युवा पत्रकार महेश मुंजेवार यांना प्रदान करण्यात आला. अडीच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शॉल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मुंढे यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना वैद्य यांनी हळदीवर आधारित उद्योगाची निर्मिती वर्धा जिल्ह्यात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण जेव्हा बारामती येथे शेतीच्या अभ्यासासाठी जात होतो, तेव्हा विदर्भातील शेतकरी आळशी असल्याची टीका केली जात होती. त्यामुळे आपण जिद्दीने शेती करणे सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार हुसैन यांनीही नव्याने पत्रकारिता करणा-या पत्रकारांनी संयमाने पत्रकारिता करण्याचा सल्ला दिला. यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी नि:शुल्क सुविधांचे विशेष आरोग्य विमा कार्डचे प्रातिनिधीक स्वरूपात जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार, शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन डाँ. आनंद इंगोले यांनी केले. संघटनेचे उपाध्यक्ष गजानन गावंडे यांनी आभार मानले.

पत्रकारितेमुळे अनेकांना मिळतो न्याय

यावेळी अध्यक्षीय भाषणात खा. तडस यांनी कोरोना काळात पत्रकारांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. समाजातील चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम पत्रकार करतात. अनेकांना न्यायही मिळवून देतात. वृत्तपत्रांमध्ये एक वेगळी ताकद आहे. शेतक-यांच्या अनेक समस्यांना पत्रकार वाचा फोडतात. शेतक-यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने त्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा तीन वर्ष खर्च द्यावा. त्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. श्रमिक पत्रकार संघाची पत्रकार भवनाची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या भवनाची फाईल आपल्याकडे आल्यानंतर भवनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे ते म्हणाले.

सकारात्मक पत्रकारितेचा अनुभव

आ. डॉ. पंकज भोयर यांनी वर्धेत सकारत्मक पत्रकारितेचा आवर्जून उल्लेख केला. पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. पत्रकार संघाचे भवन वर्धेत व्हावे, असे आम्हालाही वाटते. परंतु, त्याची फाईल अद्याप आपल्यापर्यंत पोहोचली नाही. ती फाईल आपल्याकडे आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपली असून, येत्या वर्षात पत्रकार भवनाची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here