जिल्ह्यात समूह आधारित उद्योग व्यवसायाला मिळणार चालना! जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

राहुल काशीकर

वर्धा : जिल्हयात समूह आधारित उद्योग – व्यवसाय विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने शासकीय, नीम शासकीय व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्यवयातून जिल्ह्यातील सद्य स्थितीत असलेले समूह आधारित उद्योगाला बळकटी देणे आणि नवीन उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षणासोबतच येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

जिल्ह्यात विविध क्षेत्रात समूह आधारित उदयोग- व्यवसायांच्या माध्यमातून कार्यरत स्त्री, पुरुष यांचे सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांना चांगले जीवनमान जगता यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच उद्योग – व्यवसायाला लागणारे विशेष कौशल्य व प्रशिक्षणाबाबत जिल्हयातील प्रशिक्षणाची निकड ओळखून विकासावर आधारित समूह तयार करण्यासाठी प्रशिक्षण कोर्सेसची यादी तयार करुन कोर्सेस लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.

यासाठी एमगिरी, जिल्हा ग्रामोद्योग, प्रकल्प संचालक आत्मा तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभागाने काम करावे. सदर विभागांनी महाराष्ट्र कौशल्य विकास विभागाच्या योजनेत नोंदणी करुन सदर ट्रेनिंग कोर्सेसची सुरुवात करावी.कौशल्य विकास विभागाच्या योजनेत नोंदणी करण्यासाठी सहा. आयुक्त कौशल्य विकास यांनी संबंधित तिन्ही संस्थांना सहकार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

व्यवसायानुसार वर्धा जिल्हयातील कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वर्गीकरण करून त्यांचे सीबील स्कोरनुसार यादी करावी. यामुळे त्यांना व्यवसाय वाढीसाठी लागणारा पतपुरवठा मिळत राहील. यासाठी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, एमएसआरएलएम, माविम यांनी लक्ष घालावे. समूह विकास करण्यासाठी वर्किंग ग्रुप निर्माण करण्यात यावा. जिल्हयातील संभाव्य समूह उद्योगाचे सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच जिल्हयातील विविध विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन एखादा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी इंटिग्रेटेड पोर्टल तयार करावे. जेणेकरुन बचतगटांना, लाभार्थीना अर्ज करणे , पात्रता तपासणे इ. सुविधा या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतील.

सद्यस्थितीत जिल्हयात बचत गटामार्फत व इतर समूहाचे मार्फत तयार होणा-या वस्तुंना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी त्यांच्या उत्पादनाचे मानकीकरण करणे गरजेचे असल्याने समन्वयक माविम, एमएसआरएलएम आणि
एमगिरी संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन घेऊन मानकीकरण करावे. सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वेळीच कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. समूह आधारित विकास याबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत सदर सुचना दिल्यात.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्याजित बडे, एमगिरीचे प्रतिनिधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा च्या प्रकल्प संचालक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक, मविम आणि एमएसआरएलएम चे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here