घोराड येथेही बांधकाम कामगारांच्या लाभात अफरातफर! नोंदणीकृत कामगार लाभापासून वंचित; घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी

घोराड : इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांतून लाभ देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, या लाभ वाटपात आर्थिक घोळ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता घोराड येथेही नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात लाभ जमा झाला नसल्याच्या तक्रारी येत असून, अजूनही नोंदणीकृत कामगार लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता घोराड येथील कामगारांकडून जोर धरू लागली आहे.

२०१९ मध्ये बांधकाम कामगार मंडळाने नोंदणी केलेल्या अनेक कामगारांचा समावेश आहे. नोंदणी करताना नोंदणी शुल्क २५ रुपये, मासिक वर्गणी पाच वर्षांची ६० रुपये आणि ८५ रुपये नूतनीकरण शुल्क घेण्यात आले. मार्च २०२० मध्ये कोरोना संकटात शासनाने बांधकाम कामगारांना 3 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर वर्ग १ ते ७ साठी प्रतिवर्षी २५०० रुपये आणि ८ ते १० साठी ५ हजार शैक्षणिक साहित्य जाहीर केले. २०२१ मध्ये भांडी देण्याऐवजी १५०० रुपये देण्यात आले. मात्र, हा लाभ अजूनही कामगारांच्या खात्यात पोहोचला नसून, याच रकमेत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

ही पूर्ण रक्‍कम पाहता १२००० रुपये होते. या योजनेचा लाभ सर्व नोंदणीकृत कामगारांना मिळाला का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. गरजूंच्या खात्यात हा निधी जमा झाला नसून, या निधीची अफरातफर तर झाली नसेल ना, अशी शंका व्यक्त होत आहे. घोराड येथील अनेक बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत काहींनी संबंधित कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून संपर्क उत्तर मिळाले नाही. किती कामगारांची नोंदणी झाली व किती कामगारांना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी आता लाभापासून वंचित असणाऱ्या बांधकाम कामगारांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here