

वर्धा : मृत व्यक्तीस जीवंत दाखवून दुसर्याने बनावट कागदपत्र सादर करुन विक्री पत्राचा दस्त नोंदणी करुन सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल करीत फसवणूक केली. याप्रकरणी नागपूर येथील चौघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमराव काशिनाथ कोल्हे हे 3 ऑक्टोबर २००३ मध्येच मृत झाले असतानाही दुय्यम निबंधक कार्यालयाकडे १७ मार्च २०२१ रोजी विक्रीपत्राचा दस्त नोंदणीकृत दस्तामध्ये भीमदेव काशिनाथ कोल्हे यांच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने स्वत: भीमदेव असल्याचे भासवून निस्पादीत केला. इतकेच नव्हे तर खोटा कबुली जबाबही दिला. सदर दस्तामध्ये विक्रीपत्र व ओळखपत्रासह आदी बनावट दस्तावेज सादर केल्याचे दशराज भीमदेव कोल्हे यांच्या तक्रारीवरुन निर्दशनास आले.
त्यानुसार, भूषण मदनकर, लोभेश कुळसंगे, दिनेश विलास सहारे आणि एक अनोळखी सर्व रा. नागपूर यांनी भीमदेव काशिनाथ कोल्हे हे मृत असतानाही त्यांच्या ऐवजी दुसऱ्याने भीमदेव असल्याचे भासवून दिशाभूल केली. त्यामुळे सहाय्यक दुय्यम निबेधक दिपाली महल्ले यांनी या प्रकरणाची रामनगर पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.