
वर्धा : कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवंसेदिवस कमी होत आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याचे प्रमाण देखील कमी होत असल्याने टास्क् फोर्सच्या सूचनेनुसार ग्रामिण भागातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी चे वर्ग पूर्णवेळ सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केले आहे.
शाळा सुरु करण्याबाबत विभाग प्रमुख टास्क फोर्सची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित केल्या प्रमाणे इयत्ता 1 ते 8 वीचे वर्ग दि. 16 फेब्रुवारी पासुन पुर्णवेळ सुरु करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. शाळा सुरु करण्यापुर्वी आरोग्य व स्वच्छता, सुरक्षात्मक उपाययोजना, मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकार राहणार आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या संपूर्ण लसीकरण झालेले असावे, लसीकरण झाले नसल्यास 48 तासापुर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असेल. शाळेत जंतुनाशक, साबन, पाणी इत्यादी वस्तूची उपलब्धता असावी. लसीकरण झाले नसलेल्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. बैठक व्यवस्था सामाजिकअंतर ठेऊन करण्यात यावी. कोरोना प्रतिबंधाच्या मार्गदर्शक सूचना शाळेत लावण्यात याव्या.
शाळेच्या अंतर्गत व बाहय परीसरात मुलांना रांगेत राहण्याकरीता 6 फुट इतके अंतर राखले जावे त्यासाठी चिन्हांकन करण्यात यावे. मुलांना उपस्थित राहण्याबाबत पालकांची लेखी संमती घेण्यात यावी. शाळेचा परीसर स्वच्छ व आरोगयदायी राहण्यासाठी परीसराची दररोज नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. शासनाने शाळांसाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना नियमांचे पालन शाळयाच्या मुख्याद्यापकांनी करावे, असे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे.