आधी रचला बालविवाह नंतर खावी लागली तुरुंगाची हवा! पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघड

वर्धा : बालविवाह लावून देणे तसेच बालविवाह करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही ही विकृत मानसिकता आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. असाच धक्कादायक प्रकार हिंगणघाट शहरात उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. अवघ्या १४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून तिला गर्भवती केल्याची लाजीरवाणी घटना पीडिता गर्भवती राहिल्याने उघडकीस आली.

याप्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याची माहिती दिली. हिंगणघाट शहरातील रहिवासी अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी फुला देसू कुराडे (५०) हिने आरोपी जिवन रामकिसन देवतळे (३५) याच्याशी बालविवाह लावून दिला. आरोपी जीवन याने पीडितेवर वारंवार अत्याचार करुन तिला गर्भवती केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक व समाजमन सुन्न करणारा प्रकार उजेडात आला. याप्रकरणाची माहिती तत्काळ हिंगणघट येथील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीचे बयाण नोंदवून आरोपी जिवन देवतळे आणि फुला देसू कुराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली. पीडितेवर हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here