युवकाचा गळा चिरून खून; डोक्यावरही मारल्याची जखम! दोघांना अटक

वर्धा : शहरालगत असलेल्या चितोडा पॉवर स्टेशनजवळ १८ वर्षीय युवकाचा मृतदेह मिळून आला. त्याचा गळा कापून खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचे नाव किसन गजानन देवतळे (वय १८) असे आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. शेख अनवर शेख महेबुब शेख (रा. आनंदनगर) याला अमरावती येथून ताब्यात घेतले. तर सहकार्य करणारा शेख इसाक शेख ख्वॉजा (रा. आनंदनगर) याला वर्धेतून ताब्यात घेतले आहे. आरोपीने अद्याप खुनाच्या कारणाचा खुलासा केला नसल्‍याने कारण गुलदस्त्यात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

परिसरात युवकाचा मृतदेह असल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. मृतदेहाची पाहणी केली असता गळा कापलेला होता तर डोक्यावर जबर मार असल्याचे दिसून आले. यामुळे त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरू करताच मृत किसन देवतळे हा घटनेच्या पूर्व रात्रीपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २७) तक्रार दाखल करण्यात आली आहे. किसनचा खून कोणी केला याचा कुठलाही सुगावा पोलिसांना मिळाला नाही. यामुळे हत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. आरोपीला अटक केल्यानंतरच कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here