वर्धा नदीत नाव उलटून तिघांचा मृत्यू! ८ बेपत्ता; पावसामुळे बचावकार्यात अडचण

अमरावती : जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. सतत पाऊस सुरू असल्याने श्रीक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीला सध्या भरपूर पाणी असून धबधबे सुरू आहेत. ते दृश्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्याच प्रयोजनातून देवदर्शन घेऊन ही सर्व मंडळी नावेत बसली व जलपर्यटनाचा आनंद घेत असतानाच मध्यभागी गेलेली नाव उलटली. त्यामुळे नावेतील सर्व नदीच्या खोल पाण्यात बुडाले.

नाव चालविणारा नारायण मटरे याने एका चिमुकलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला एका हातात घेऊन पोहत पाण्याबाहेर येत असताना त्याचा दम भरून आल्याने तो चिमुकलीसह बुडाला. बुडालेल्यांपैकी तीन मृतदेह शोधण्यात यश आले होते. उर्वरित मृतदेहांचा शोध स्थानिकांच्या मदतीने प्रशासन घेत आहे. अमरावतीवरून आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले असून उर्वरीत मृतदेहांचा शोध घेणे सुरू आहे. या परिसरात मुसळधार पाऊस सुरू बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

दरम्यान तीन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. घटनास्थळी खासदार रामदास तडस, आमदार देवेंद्र भुयार, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, जि. प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे सकाळपासून घटनास्थळावर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here