
पवनार : देशातील सर्वात उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करून नवा विक्रम प्रस्थापित केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक महत्व असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टन म्हणजेच खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वात उंच ध्वज उभारला जात आहे. आज १४ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील विनोबा भावे आश्रम येथे स्वराज्य ध्वजाची पूजा करण्यात आली पुजनानंतर ध्वज यात्रा नागपूरकडे रवाना झाली.
लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ७४ प्रमुख अध्यात्मिक, धार्मिक स्थळी, संतपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी नेण्यासाठी ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची महती सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून विश्व स्तरावर महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टन म्हणजेच खर्डा किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजा ची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
यावेळी नाना गवई, कृषिकेश परभाजन, रामदास दुताड, संजय शिंदे,पंकज लोखंडे हे कार्यकर्ते आले होते. स्वराज ध्वजाचे स्वागत व पूजन ब्रह्म विद्या मंदिरचे गौतमभाई बजाज, राष्ट्रवादीचे सुनील राऊत, संदीप किते,सोसायटीचे अध्यक्ष रणजित भांडवलकर, तेली समाज संघटनेचे किशोर सोनटक्के, गणेश हिवरे, चंदू वाघमारे, रामदास घुगरे, अर्चना घुगरें, येरुणकर आदीची उपस्थिती होती.


















































