पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांना भरधाव कारने चिरडले! एक ठार; मुलासह पाच जण गंभीर

वर्धा : पाणीपुरी खाण्यास गेलेल्या नागरिकांना भरधाव येणाऱ्या कारने चिरडले असून एका कारला जबर धडक दिली. तसेच पाणीपुरीच्या ठेल्याला धडक देत सुमारे २० ते ३० फूट अंतरापर्यंत खेचत नेऊन भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात जात तीन ते चार पलट्या खाल्या. हा विचित्र अपघात ८ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास देवळी नाका परिसरात असलेल्या आंबेडकर शाळेसमोर भिमनगर येथे झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

अतुल मधुकर घोरपडे (३१) रा.समतानगर असे मृतकाचे नाव आहे. तर त्याची पत्नी प्रतिक्षा घोरपडे, मनीषा भगत, सक्षम भगत, विजयसिंग बघेल, सुनील भगत हे गंभीर जखमी असून सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. विजयसिंग बघेल हा आंबेडकर शाळेसमोरील रस्त्यालगत कृष्णा पाणीपुरी भेळ सेंटर नावाचा ठेला चालवितो. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास अतुल घोरपडे त्याची पत्नी प्रतिक्षा हे एम.एच. ३२ एएच. ३७०६ क्रमांकाच्या कारने पाणीपुरी खाण्यास थांबले दोघेही कारमध्ये बसूनच पाणीपुरीचा आस्वाद घेत होते. इतकेच नव्हेतर तेथे सुनील भगत त्यांची पत्नी मनीषा भगत आणि मुलगा सक्षम भगत हे देखील रस्त्याकडेला उभे राहून पाणीपुरी खात होते.

दऱम्यान राजू चंपत पाटील (२७) रा. समतानगर याने त्याच्या ताब्यातील एम.एच. ०२ बी.झेड. २६८१ क्रमांकाची कार बेदारकपणे व निष्काळजीपणे चालवून एम.एच.३२ ए.एच. ३७०६ क्रमांकाच्या कारला मागाहून जबर धडक दिली. तसेच रस्त्याकडेला फुटपाथवर असलेल्या पाणीपुरीच्या बंडीला तसेच पाणीपुरी खात असलेल्या नागरिकांना चिरडले. भरधाव कारने पाणीपुरीच्या बंडीला काही दूर अंतरावर खेचत नेले. आणि रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात जाऊन भरधाव कार पलटी झाली. या अपघातात अतुल घोरपडे याचा सावंगी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रतिक्षा यांची प्रकृती गंभीर आहे. तसेच पाणीपुरी विक्रेता विजयसिंग बघेल हा बेशुद्ध असून उपचार सुरु आहे. मनीषा भगत त्यांचा मुलगा सक्षम भगत यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावरही उपचार सुरु आहे. सुनील भगत याला किरकोळ जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here