
वर्धा : पुलगाव शहरातील रहिवासी वीटभट्टी मालकाला अज्ञाताने फोन करून तब्बळ ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मुला-मुलीचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली. या घटनेने पुलगाव शहारात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात
आली आहे.
मीरा कॉलनी परिसरातील रहिवासी किशोर चुन्नीलाल कल्पे यांचा हिवरा हाडके परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय आहे. ते घरी असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि ४० लाखांची खंडणी मागितली.
त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर पैसे न दिल्यास मुला-मुलीचे अपहरण करण्याचा धमकीचा मेसेज आल्याने किशोर कल्पे यांनी थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पुलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.




















































