मोटार पंप चोरणाऱ्या तिघांना बेड्या! सेलू पोलिसांची कारवाई; ७० हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

वर्धा : पाण्याची मोटार आणि तांब्याची तार चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना सेलू पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक करून त्यांच्याकडून वाहनासह चोरीतील मुद्देमाल असा एकूण ७० हजार ३०० रुपयांचा माल हस्तगत केला.

आकाश अजाब सहारे, रवींद्र शिवकुमार ठाकरे, अनिकेत अशोक येसने सर्व रा. पिंडकेपार, ता. खैरलांजी, जि. बालाघाट ह.मु. कोथीवाडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेतात असलेल्या विहिरीवरुन पाण्याची मोटार चोरुन नेल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शोध पथकाकडून सुरू असताना त्यांना तीन संशयित व्यक्तींची माहिती मिळाली.

पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून जुनी वापरती पाण्याची मोटार, तांब्याची तार, व एक छन्नी, हातोडा तसेच एम:एच. ३१ डी.एक्स.८११२ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, नारायण वरठी, कपिल मेश्राम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here