
विजयगोपाल : येथून नजीकच असलेल्या चोढी गावातील जि. प, शाळेच्या इमारतीला वीजप्रवाह असल्याने याबाबतची तक्रार मुख्याध्यापिकेकडे करण्यात आली होती. मात्र, याला सहा महिने उलटूनही याकडे दुर्लक्ष केल्याने शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांचा जीव धोक्यात आला आहे. नाचणगाव येथील घटनेची पुनरावृत्ती तर येथे होणार नाही ना, अशी भीती नागरिकांत असून, मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चोढी गावातील जि.प.च्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षक शाळेत येत आहेत. शिक्षक शाळेत येताच त्यांना भेटायला विद्यार्थीही येत असतात. सहा महिन्यांपूर्वी काही मुलं, मुली शिक्षकांना भेटण्यास गेले असता शाळेतील खिडकीला हात लावला असता त्यांना जोरदार विजेचा झटका लागला. ही बाब मुख्याध्यापिकेलाही माहिती होती. मात्र, तरीसुद्धा दुरुस्ती केलेली नसल्याने कुणाचा जीव गेल्यावरच जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत नरेंद्र डहाके यांनी अनेकदा तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱयांकडून करण्यात येत आहे. तत्काळ शाळेतील वीज मिटरची दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरुन कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही, अशी मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.