
वर्धा : माझ्या मुलीच्या मोबाईलवर आरोपी युवकाने ‘एक तर तू मर नाही तर मी मरतो,’ असा मेसेज केल्याने तसेच त्याने तिला त्रास दिल्याने याच त्रासातून माझ्या मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, अशी तक्रार मृतक मुलीच्या आईने आष्टी पोलिसांत दाखल केली असून पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी दिली.
प्रथमेश पुरुषोत्तम कोहेरे (२२, रा. नशिदपूर, ता, मोर्शी, जि. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोरगव्हाण येथील रहिवासी प्रगती मुरलीधर बोरिवार ही १६ वर्षीय मुलगी १९ रोजी कुणालाही न सांगता घरातून दुपारच्या सुमारास निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने ती मैत्रिणीकडे गेली असावी, या कारणातून घरच्यांनी तिचा शोध घेतला. अखेर दुसऱ्या दिवशी २० रोजी गावाला लागून असलेल्या रस्त्यावरील सुदाम वाघ यांच्या शेतात मंगेश सायरे बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला असता प्रगतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला.
याप्रकरणात आष्टी पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता मृत प्रगतीची आई रजनी बोरिवार यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी प्रथमेश पुरुषोत्तम कोहरे याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रगतीच्या मोबाईलवर फोन करून’तू मर नाही तर मी मारतो,’ असे म्हणाला होता, आरोपी प्रथमेशनेच माझ्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत सांगितल्यावरून त्याच्यावर कलम ३०५ नुसार, गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक अतिल देरकर यांनी केली.

















































