

वर्धा : राज्य शासनाने रब्बी हंगाम 2022-23 करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विमा हप्ता भरून दिनांक 15 डिसेंबर पर्यंत या योजनेत सहभागी होऊ शकतात. सदर योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे.
खरीप व रब्बी हंगाम 2022 करिता जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंम्बार्ड जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. अन्नधान्य व गळीतधान्य पिके यासाठी विमा संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम आहे. उर्वरित विमा हप्ता रक्कम ही शासन स्तरावरून भरण्यात येणार आहे.
पिकविम्याचे अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी शेतकऱ्यांची गर्दी टाळण्याकरीता विम्याचे शेतकऱ्यांचे अर्ज, विमा हप्ता कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर या अंतिम दिंनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. सहभागासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, पिक विमा कंपनीचे कार्यालय तसेच नजीकच्या बॅंकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.