

विरूळ (आकाजी) : गावात विदर्भातील पहिली मोफत दळणाची पीठगिरणी सुरू करण्यात आली असून, या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उपक्रमांतर्गत कुटुंबांचा दळणाचा खर्च वाचणार असून वार्षिक खर्चात बचत होत आहे. उपक्रमाला समजून घेण्यासाठी परिसरातील व जिल्ह्याबाहेरेल नागरिक विरुळा ग्रामपंचायतीला भेट देत आहे.
पाच हजार लोकसंख्या असलेल्या विरूळ गावात मोफत दळण दळून घेता येईल या अनुषंगाने दहा हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविली आहे. चक्कीला निरंतर मोफत वीजपुरवठा व्हावा, यासाठी ग्रा.पंच्या छतावर दहा किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले. सोलर पॅनल अंतर्गत प्रती महिन्याला १५०० युनिटची वीजनिर्मिती स्वतः ग्रा.पं. करीत आहे. निर्मित केलेला वीजपुरवठा विद्युत॒ स्टेशनला पाठविण्यासाठी वीज जोडणी ग्रा. पं. कार्यालय व विद्युत वितरण स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रा. पं.ला कुठलीही वीजबिल आकारणी होत नसून मोफत दळण दळून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आली असून कर थकबाकी नसलेल्या कुटुंबाना मोफत दळण व इतरांना वाजवी दरात दळण दळून दिल्या जाते. तसेच सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमासाठी वाजवी दरात दळण दळून दिल्या जात आहे. सरपंच अँड. दुर्गाप्रसाद मेहरे व कमिटीच्या नावीन्यपूर्ण अभिनव कल्पनेतून हा मोफत पिठ गिरणीचा प्रकल्प कार्यन्वित झालेला आहे.