

आंजी (मोठी) : नजीकच्या खानापूर शेतशिवारात धुऱ्याला लावलेल्या आगीत सुदाम कृष्णा शिंदे (६८, रा.वर्धा) यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदाम हे शेतातील धुऱ्यावरील कचरा जाळत होते. दरम्यान तोल गेल्याने ते नाल्यात पडले. अशातच नाल्याच्या दोन्ही बाजूचे वाळलेले गवत आगीने कवेत घेत रौद्ररुप धारण केले. परिणामी, सुदाम यांना वेळीच नाल्याबाहेर पडता आले नाही. अशातच आगीत होरपळून आणि गुदमरून सुदाम यांचा मृत्यू झाला.
सायंकाळी उशीर होऊनही सुदाम घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा सुदाम यांचा मृतदेह शेत शिवारात आढळून आला. त्यानंतर खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंजी (मोठी) येथील पोलीस चौकीतील पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस चौकीतील गिरीश चंदनखेडे, अमर हजारे व पोलीस पाटील गोपाल अवथळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे.