
सेलू : ‘मॉर्निंग वॉक’ साठी घराबाहेर पडलेल्या महिलेला टार्गेट करून दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या घटनेमुळे कान्हापूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कान्हापूर येथील वंदना विनोद सातपुते (४०) या. मैत्रिणीसोबत सकाळी वर्धा-नागपूर मार्गावर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. दरम्यान, दुचाकीने नागपूरकडून वर्धेच्या दिशेने जाणाऱ्या तीन तरुणांनी वंदना यांना वाटेत थांबवून पुलगावकडे जाण्याचा मार्ग विचारला. अज्ञातच महिलेला काही कळण्यापूर्वीच या चोरट्यांनी वंदनाच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला.
या प्रकरणी वंदना सातपुते यांनी सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सेलूचे ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन कंगाळे, विजय कापसे, नारायण वरठी करीत आहेत.