
समुद्रपूर : भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने नागपूरकडून जामकडे जाणाऱ्या एम.पी. २० सी.ई. ९०९७ क्रमांकाच्या कारला धडक दिली. यात कारमधील महिलेचा गळा चिरल्या गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.
नागपूर येथील त्रिमुर्तीनगर भागातील रहिवासी अमित विष्णूप्रसाद श्रीवास्तव (४७) व कोमल पोफाळे (२४) हे दोघे एम. पी. २० सी. ई. ९०९७ क्रमांकाच्या कारने जामच्या दिशेने जात होते. वाहन खंडाळा पाटी शिवारात येताच अज्ञात वाहनाने विरुद्धदिशेने येत कारला चालकाच्या विरुद्ध दिशेने धडक देत घटनास्थळावरून पळ काढला.
यात कोमल पोफाळे यांचा गळा चिरल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, किशोर येळणे, नागेश्वर तिवारी, देवेद्र पुरी, नरेंद्र दीघडे, कांचन नव्हाते, बंडू डडमल, पंकज वैद्य, दिनेश धवने, दिलीप वांदिळे यांनी घटनास्थळ गाठून जखमी व मृतकाला रुग्णाल्याकडे रवाना केले.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्याकडेला करून वाहतूक सुरळीत करावी लागली. शुक्रवारी दिवसभर या अपघाताबाबतची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती.