टाळेबंदी वाढण्याची चिन्हे मुख्यमंत्र्यांचे संकेत,मे अखेपर्यंत काळजी आवश्यक

सर्वपक्षीय बैठकीत आढावा

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह

करोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मेअखेपर्यंत काळजी घेऊन आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी राज्यात आणखी लांबण्याचे सूतोवाच केले. एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतली. करोनाविरोधी लढय़ात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पालघर लाल क्षेत्रात आहे. पण याठिकाणी आदिवासी भागही आहे. त्यांचे हाल होत आहेत. सकाळ, संध्याकाळ अशारीतीने उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी के ली. तर रिक्षा, हातगाडय़ा घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

स्थानिकांना रोजगार संधी द्या – राज ठाकरे

परप्रांतीय कामगार-छोटे व्यावसायिक परत गेल्याने ज्या रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत त्याची माहिती सरकारने महाराष्ट्रातील बेरोजगारांना द्यावी. त्यातून राज्यातील लोकांना रोजगार मिळू शके ल, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे के ली. आता परत आपल्या राज्यात जाणाऱ्या श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी. ते परत येतील तेव्हा त्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना परत घेऊ नये, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर टाळेबंदी करताना आगाऊ सूचना दिली पाहिजे.

रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा हवी- फडणवीस


मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे. आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


करोनाशिवायच्या इतर रुग्णांकडे दुर्लक्ष सुरू आहे. औरंगाबादमधील १४ कोटी रुपये खर्चून घाटी रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. पण मनुष्यबळ नाही याकडे लक्ष वेधत दारू दुकाने उघडण्याचा निर्णय चुकीचा होता, असे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

कोकणासाठी विशेष रेल्वे हवी.. असंघटित कामगार, मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वती नसल्याने त्यांना आधार द्यावा. कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात, मालमत्ता कर, उपकर स्थगित करावा, अशा मागण्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्या.
टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात करोनाची साथ नियंत्रणात राहिली. आता मेअखेपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वानी सहकार्य केल्यास यात यश येईल. महिना सरेपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल. त्यामुळे नारिंगी आणि हिरव्या क्षेत्रातील धोका वाढणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here