हातातोंडाशी आलेली आमदारकी गेली, तरी गोपछडे म्हणतात…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड लोकसभा तसेच नांदेड आणि नायगाव विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असलेले डॉ. अजित गोपछडे यांचे नेहमीच नाव अग्रेसर असायचे आणि शेवटच्या टप्यात त्यांचा पत्ता कट व्हायचा. पण विधानपरिषदेच्या निमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरील अन्याय दूर करत उमेदवारी दिली अशी भावना निर्माण होत असतांना गोपछडे यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय करण्यात आला. लातूरच्या रमेश कराड यांच्यासाठी पक्षश्रेष्ठीने गोपछडे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झालेले डॉ. अजित गोपछडे हे नांदेडमधील भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कात आणि तालमीत तयार झालेल्या गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रामदेव बाबा यांच्यासारख्या आजच्या दिग्गजांमध्ये देखील आपल्या कामाची छाप पाडली.

बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. गोपछडे यांचे नाव नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून नेहमीच अग्रेसर असायचे. पण नंतर सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली गोपछडे यांना डावलले जायचे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाने गोपछडेंना न्याय दिल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण उमेदवारीचा हा आनंद फारकाळ टिकला नाही.
विधान परिषदेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पक्षाने चार अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा लातूरचे रमेश कराड यांचा अर्ज दाखल झाला आणि नांदेडमधील गोपछडे समर्थकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. आज अखेर ही शंका खरी ठरली, पक्षाने गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावली आणि गोपछडे यांना नशिबाने पुन्हा हुलकावणी दिली.

पक्षाने घेतलेला निर्णय महत्वाचा.

दरम्यान, गोपछडे यांनी मात्र या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त न करता माझ्यासाठी बाकीच्या विषयावरील चर्चा ही गौण आहे, पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय महत्वाचा आणि अंतिम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीच उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्याच सूचनेनुसार आज अर्ज मागे घेतला आहे. पुन्हा ज्या वेळेस पक्ष संधी देईल, त्या वेळी आपण आदेशाचे पालन करत राहू, असे गोपछडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here