सायबर सेलकडे ११ कर्मचारी! ९७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले यश

वर्धा : सोशल मीडिया साईटवरून फोन पे, गुगल पे, एटीएम फ्रॉड आदी विविध प्रकारे नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात येते. सायबर सेलकडून तत्काळ तक्रारींची दखल घेत निपटारा करण्याचे काम केले जाते. मागील १३ महिन्यात ऑनलाईन फसवणूक आणि विविध ऑनलाईन प्रकरणात तब्बल ९७ प्रकरणे दाखल झाली असून ६२ लाख ६१ हजारांची रक्कम लंपास केल्याचे पुढे आले. मात्र, सर्व ९७ ही प्रकरणे उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला यश आले आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. मात्र, या कालावधीत सायबर भामट्यांनी नागरिकांच्या सोशल साईटवर दरोडा टाकून अनेकांची फसवणूक केली. सोशल साईटचा दुरपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बँक ग्राहकांना आपली शिकार बनवून डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व एटीएम कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे. फेसबूकवर फेक अकाऊंट तयार करून पैसे उकळविण्याचा धंदा सायबर भामट्यांकडून सुरू आहे. यासंदर्भात नागरिकांची जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलद्वारा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात येत असली तरी ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.

आलेल्या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी सखोल तपास करतात. मोबाईलवरून बँकिंगचे आर्थिक गुन्हे, चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन पाहून चोरट्यापर्यंत पोहोचणे, बक्षीस लागले आहे असे सांगून सर्वसामान्यांची फसवणुक करणे असे प्रकार घडत आहेत. मोबाईलच्या सहाय्याने मटका घणे, सट्टा लावणे आदी प्रकारही सायबर गुन्ह्यांमध्ये येत आहेत. फेसबूक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या साईटवरून आक्षेपार्ह मजकूर लिहिणी, फेक प्रोफाईल तयार करण्याच्या घटनाही घडत चालल्या असून पोलीस विभागाकडुन अशांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here