मेहुण्याच्या लग्नाची पत्रिका वाटप करणे बेतले जीवावर! एक ठार, दोन गंभीर; भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन तिघेही पडले जमिनीवर

वर्धा : मेहुण्याच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी जात असलेल्याची भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली. अशातच झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना चांदूर (रेल्वे) तालुक्यातील पळसखेड शिवारात झाली.

नजीकच्या पढेगाव येथील प्रवीण मुडे यांचा मेहुणा प्रकाश गिरडकर याच्या विवाहाची तारीख ३० एप्रिल निश्चित करण्यात आली. याच लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी प्रवीण मुडे, प्रकाश गिरडकर तसेच रामेश्वर गिरडकर हे एमएच २७ बीटी २४७० क्रमांकाच्या दुचाकीने चांदूर (रेल्वे) येथून येणस येथे जात होते. भरधाव दुचाकी पळसखेड शिवारातील वळण रस्त्यावर आली असता खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावरील तिघेही जमिनीवर पडले. यात प्रवीण मुडे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश व रामेश्वर हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद चांदूर पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here