कंटेनरमध्ये सापडले तब्बल २२ जनावरांचे मृतदेह! दुर्गंधी पसरल्याने घटना उघडकीस

देवळी : नजीकच्या एकपाळा शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये तब्बल २२ जनावरे मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अन्न-पाण्याअभावी या जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात असून, या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे. गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

एकपाळा शिवारात उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून कुजल्यागत दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ही माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता कंटेनरमध्ये जनावरांचे मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर देवळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रणाली जोशी यांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता अन्न-पाण्याअभावी या जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला. यवतमाळकडे जाणाऱ्या या कंटेनेरचा देवळी नजीकच्या यशोदा नदीजवळ टायर फुटल्याने हा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला. हा प्रकार नेमका काय, याबाबतची माहिती देवळीच्या ठाणेदार शफकत आमना यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here