‘करोना’ चा वाढता धोका लक्षात घेता सैलानी यात्रा स्थगित

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – ‘करोना’चा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील यात्रा, उत्सवांना स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सैलानी यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यापैकी कुणीही करोना विषाणूने बाधीत असल्यास त्याची लागण अन्य भाविकांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून सैलानी बाबांची ख्याती आहे. होळीपासून पाच दिवसांवर सैलानी बाबांचा संदल असतो. होळीच्या दिवशी पंधरा ते वीस ट्रक नारळांची येथे होळी पेटते. या होळीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक सैलानीत हजेरी लावतात. त्याचप्रमाणे बाबांच्या संदललाही विशेष महत्त्व असल्याने या दिवशी सुमारे आठ ते दहा लाख भाविक सैलानी परिसरात जमतात. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. परदेशातूनही काही भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे करोनाचा धोका व्यक्त झाला होता. सध्या करोनाचा वाढता प्रसार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापक उपाय योजले जात आहेत. सरकारनेही निर्देश जारी केले आहेत. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी करोना विषाणू प्रसाराबाबत यंत्रणांच्या तयारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांची परिषद घेतली. राज्यातील यात्रा, उत्सव आवश्यकतेप्रमाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयुष सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, भूसंपादन आदी विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त यांनी करेाना विषाणू प्रसारसंदर्भात सैलानी यात्रा नियोजन बैठकही घेतली. या यात्रेच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, सांकेतिक जिल्हाधिकारीपदावर असलेल्या साक्षी वैराळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, उपवनसंरक्षक माळी, सैलानी ट्रस्टचे विश्वस्त व संबंधित प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here