बिबट्याची दहशत! आठ दिवसांत आठ शिकार; वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न

झडशी : परिसरातील चारगाव, बोरखेडी येथे मागील चार वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने यावर्षी वाघाने चांगलाच कहर केला आहे. मागील आठ दिवसांत आठ जनावरांचा फडशा पाला असून मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले नाही. मात्र, आता जनावरांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चचपणी सुरू केली असून ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पडताळणी करीत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. आगाशे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक घनश्याम टाक, वनरक्षक आर. डी. बहादुरे, पी. एस. आडे, बी. बी. परबत, बी. के. वैद्य, सुदाम मुगले, विठ्ठल उडान, रामा उईके, शरद श्रीराम यांनी गस्त वाढविली आहे.

आठवडाभरात पाच जनावरांचा पाडला फडशा

बिबट्याने कैलास दरणे, भानुदास भगत, खुशाल भुजाडे, योगेश गडकरी, भाऊराव लिडबे या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा पाडला. याबाबत हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. आगाशे यांना विचारणा केली असता झडशी सह वनक्षेत्रात घडत असलेला बिबट्याचा वावर मी गंभीरतेने घेतला असून आजच वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार मानवजातीस धोका होण्याची शक्यता असल्याने बिबट्यास जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here