
वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे; पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई-पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दादाकडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना साधी विचारपूसही केली जात नसल्याचे दिसून आले.
कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आली आहे, तर ई-पास नसलेल्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून परत पाठविणे क्रमप्राप्त असताना चेकपोस्टवरील कर्मचारी ये-जा करणाऱ्यांची साधी नोंदही घेत नसल्याचे दिसून आले.


















































