शेतकरी, शेतमजुरांमध्ये दहशत! शेळीपालनात वाघाने घातला धुडगूस; एक शेळी केली फस्त

कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील लिंगा मांडवी परिसरात वाघाने चांगलीच दहशत पसरविली आहे. बुधवारी पहाटे एका शेळीपालनात धुडगूस घातला असून शेळी फस्त केली. यात शेतकऱ्याचे १३ हजार रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लिंगा गावालगत पीयूष डोंगरे यांचे शेळीपालन असून त्यामध्ये ७० शेळ्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास वाघाने या शेळीपालनामध्ये प्रवेश करून एक शेळी फस्त केली. या शेळीने दहा दिवसांपूर्वीच दोन पिलांना जन्म दिला आहे. यापर्वीही वाघाने डोंगरे यांच्या शेळीपालनात शिरून त्यांचे बरेच नुकसान केले. परंतु वनविभागाकडून कोणताही मोबदला मिळाला नाही. आताही १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

लिंगा मांडवी हा जंगलव्याप्त परिसर असून शेतकऱ्याना बाराही महिने शेतीमध्ये जागलीला जावे लागते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून वाघाची दहशत असल्याने जीव मुठीत घेऊन शेतकरी जागलीला जात आहे. या घटनेमुळे शेतकरी जागलीला गेलेच नाही. गावात सर्वत्र भीतीचे वातावरण असून यासंदर्भात वनविभागाला वारंवार सूचना केली. तरीही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. यापूर्वीही वाघाने अक्षरश: गावात शिरून गायीला ठार केले होते. त्यामुळे वनविभागाने वेळीच दखल घेऊन या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here