सत्याग्रही घाटात आढळला कुजलेला मृतदेह! परिसरात एकच खळबळ उडाली

तळेगाव (श्या.पंत) : येथील नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.

नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाट भागातील जैन मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून मृतकाची ओळख पटली नव्हती. ही हत्या की आत्महत्या याचा शोध घेण्यासह मृतकाची ओळख पोलिसांकडून पटविली जात आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार राजेश साहू, कैलास डांगे, सुरज राठोड, विजय उईके, अमोल इंगोले करीत आहेत. या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. बघ्यांची गर्दी बाजूला सारताना पोलीस कर्मचाऱ्यांची एकच दमछाक झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here