पॉझिटिव्हिटी दर दिलासादायक मात्र वर्धेकरांची वर्तणूक ठरते धोकादायक! परिस्थिती नियंत्रणात; सोमवारपासून सर्वत्र अनलॉक: बाजारात दिवसेंदिवस वाढते गर्दी

वर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात राहिली असताना दुसऱ्या लाटेत चांगलाच हाहाकार माजविला होता. वृद्धांसह तरुणांनाही आपल्या कवेत घेऊन अनेकांचे कुटुंब उघड्यावर आणले. त्यामुळे कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हिटीच्या दरापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्वत्र अनलॉक झाल्याने बाजारपेठेतही पूर्वीप्रमाणे गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे हे वर्तन कोरोनाकाळात धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये कोरोनाचा विस्तार वाढत गेल्याने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी उपाययोजना केल्यात. कोरोनाचे घराघरात रुग्ण सापडत असल्याचे निदर्शनास येताच जिल्ह्यातील दोन्ही कोविड रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या. तसेच पाच खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली. सोबतच ऑक्सिजन निर्मितीवरही भर दिला. परिणामी कडक निर्बंधानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी व्हायला लागली. गेल्या आठवड्याभरात ८ हजार ४३६ चाचण्या करण्यात आल्या असून ९५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यावरुन आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १.१२ टक्क्यावर आला आहे. या आठवड्यात ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात १ हजार २३० बेडची व्यवस्था असून सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तेथे तब्बल १ हजार १९७ बेड रिक्त आहेत. त्यामुळे कोविड रुग्णालयातील केवळ २.६८ टक्केच बेड रुग्णांनी व्यापले असून ९७.३१ टक्के बेड रिक्त असल्याने जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात आला आहे.
म्हणूनच सोमवारपासून जिल्हा पूर्णत: अनलॉक करण्यात आला. सर्व दुकाने नियमित वेळेत सुुरू ठेवण्याचे निर्देश दिले असून जमावबंदीही उठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दिलासादायक परिस्थिती असली तरीही नागरिकांनी बेशिस्त वागणे टाळण्याची गरज आहे. अजुनही धोका टळला नसल्याने नियमावली टाळून चालणार नाही.

जानेवारीपासून ४० हजार कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यातील आठही तालुक्यात पहिल्या लाटेदरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत ९२ हजार ५९९ अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८२ हजार ७३३ निगेटिव्ह आले असून ९ हजार ६२ व्यक्ती कोरोनाबाधित झाले होते. दरम्यानच्या काळात ८ हजार ४८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २७२ रुग्णांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती चांगलीच भयावह झाली होती. त्यामुळे २० जूनपर्यंत ३ लाख ९७ हजार ७२६ अहवाल तपासणीकरिता पाठविले असून त्यातील ३ लाख ४४ हजार ९८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ४९ हजार ११५ कोरोनाबाधित आढळले असून ४७ हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ३२० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेतील २७२ मृतकांचा आकडा दुसऱ्या लाटेनंतर तब्बल १ हजार ३२० वर पोहोचल्याने, यावरुन दुसऱ्या लाटेची भीषणता लक्षात येते.

ना सोशल डिस्टन्सिंग; ना मास्क, सारेच बिनधास्त

सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठविण्यात आल्याने बाजारपेठा नियमित वेळेत सुरु करण्यात आल्या. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांसह दुकानदारांनीही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. पण, सद्यस्थितीत ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क, सारेच बिनधास्त, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि महसूल विभागही आता कारवाईकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे अशीच स्थिती राहिली तर ती तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here