
पवनार : केळीला मिळणारा बाजारभाव कोसळल्यानंतर वर्ध्यातील अनेक उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा निर्णय घेत आपल्या तब्बल २० एकर केळी बागेवर नांगर फिरवत पिक काढून टाकले. कोणत्याही प्रकारचा रोग, किड किंवा नैसर्गिक आपत्ती नसतानाही — केवळ भाव न मिळाल्यामुळे वाघमारे यांना लाखोंचे नुकसान सोसत हा निर्णय घ्यावा लागला आहे.
कुंदन वाघमारे हे परिसरातील प्रगत व मार्गदर्शक शेतकरी म्हणून ओळखले जातात. मे महिन्यात त्यांनी आपल्या केळीला १८ रुपये किलो इतका चांगला दर मिळवला होता. त्यानंतरही बाजारात दर स्थिर राहील अशी अपेक्षा होती. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. निर्यातदारांनी खरेदी बंद केली, तर स्थानिक बाजारात देखील व्यापाऱ्यांनी अचानक भाव कोसळवले. सध्या बाजारात व्यापारी केवळ ३ ते ४ रुपये किलो दराने केळी खरेदी करत आहेत. शेतातील उत्पादन खर्च, मजुरी, पाणी व्यवस्थापन, खते आणि बागेची देखभाल यावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही मिळणारा हा तुटपुंजा दर शेतकऱ्यांसाठी तोटा वाढवणारा ठरतो आहे. या दरात पिक काढणीचा खर्च देखील भागत नसल्याने वाघमारे यांना संपूर्ण बाग काढणे भाग पडले.
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे बागेवर कोणताही रोग आला नव्हता, केळीची गुणवत्ता उत्तम होती आणि बाजारात मालही चांगल्या स्थितीत उपलब्ध होता. तरीदेखील व्यापाऱ्यांनी भाव पाडत शेतकऱ्यांना अडचणीत ढकलले. निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारातील मागणी कमी पडली आणि व्यापारी मोकळेपणाने भावावर नियंत्रण ठेवू लागले. वाघमारे यांच्यासारख्या प्रगत शेतकऱ्यालाही पिकावर नांगर फिरवावा लागणे हा परिसरातील इतर उत्पादकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. “जर वाघमारेसारख्या अनुभवी शेतकऱ्याला बाग काढावी लागत असेल, तर लहान शेतकऱ्यांची स्थिती काय असेल?” असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. जिल्ह्यातील केळी उत्पादनावर भावघसरणीचे सावट गडद झाले असून शासनाकडून तातडीची मदत, हमीभाव व बाजार व्यवस्थापन स्थिर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
बॉक्स…..
दरवर्षी कुंदन वाघमारे हे आपल्या केळी पिकातून सरासरी ६० ते ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. प्रगत शेती, वैज्ञानिक पद्धती आणि काटेकोर व्यवस्थापन यामुळे त्यांची बाग परिसरात आदर्श मानली जाते. केळी लागवडीसाठी प्रति एकर जवळपास एक लाख रुपयांचा खर्च येतो. यावर्षीही त्यांनी आपल्या २० एकर बागेसाठी तब्बल २० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन, मजुरी आणि बागेची निगा या सर्वांवर मोठा खर्च करूनही केळीला योग्य बाजारभाव न मिळाल्याने खर्चसुद्धा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती पाहता वाढत्या तोट्यापासून बचाव करण्यासाठी वाघमारे यांनी अखेर बागेवर नांगर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.
प्रतिक्रिया…
केळीबाबत माहिती घेतली आणि संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला असता हे स्पष्ट दिसून आले की सध्या केळीला अक्षरशः कवडीमोल भाव मिळतो आहे. वर्षभरात या दरात काही सुधारणा होण्याचीही शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत बाग सांभाळली तर तोटाच वाढणार, खर्च काहीच भरून निघणार नाही. रोजच्या देखभालीचा खर्च, मजुरी आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर मोठा पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे पिकाला भावच नसेल तर ही बाग टिकवणे म्हणजे आर्थिक घसरण वाढवणं. म्हणूनच परिस्थितीचा नीट विचार करून हा कठोर निर्णय घ्यावा लागला.
कुंदन वाघमारे, प्रयोगशील शेतकरी पवनार























































