खारडी-भारडी येथील घाटावर महसूल विभागाची कारवाई! तीन ट्रक, दोन बोट जप्त; इतरही वाळू घाटधारकांमध्ये खळबळ

वर्धा : हिंगणघाट तालुक्‍यातील वणानदीच्या पात्रावर असलेल्या खारडी-भारडी वाळू घाटावर महसूल विभागाने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धडक दिली. घाटातून तीन ट्रक व दोन बोटी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा खनिकर्म विभाग आणि हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आली.

खारडी-भारडी घाटाचा लिलाव झाला असून हा घाट लक्ष्मी इन्फ्राने घेतला होता. या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा खनिकर्म विभाग आणि हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या घाटावर धडक दिली. यादरम्यान घाटामध्ये दोन बोटी, तीन ट्रक आढळून आल्याने ते सर्व जप्त करून हिंगणघाट तहसीलमध्ये लावण्यात आले. आता जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली. या कारवाईमध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार सतीश मसाळ यांच्यासह जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी तसेच हिंगणघाट व वडनेर पोलिसांचा सहभाग होता. जप्त केलेल्या वाहनांवर किती दंड आकारला जातो याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे आता इतरही घाटधारकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here