
वर्धा : येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयातील सर्वच ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात छोटे-मोठे एकूण ९९ ऑक्सिजन सिलिंडर असून रुग्णालय प्रशासनाला रिफिलिंगसाठी दररोज तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सध्या हे संपूर्ण बेड फुल्ल असल्याने या रुग्णालयाची मेडिकल ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे छोटे-मोठे असे एकूण सुमारे ९९ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. याच सिलिंडमध्ये साठवणूक केलेला प्राणवायू आयसोलेशन वॉर्डच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन कंट्रोल रूममधून कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या ॲक्टिव्ह कोविडबाधिताला ऑक्सिजन वाहिनीच्या माध्यमातून दिला जातो. पण उपलब्ध असलेले सर्वच सिलिंडर सध्याच्या ऑक्सिजन मागणीच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना रिकामे ऑक्सिजन सिलिंडर वेळीच भरून आणून कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.



















































