

समुद्रपूर : जाम येथील एका हॉटेल व्यावसायिकाने दहेगाव (उजवणे) येथील हॉटेल व्यावसायिकाची हत्या किंवा घातपात करण्यासाठी तिघांना एक लाखाची सुपारी दिली होती. याची भनक लागताच दहेगाव (उजवणे) येथील हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून हा कट उधळून लावला
आणि सुपारी घेणाऱ्या तिघांसह सुपारी देणाऱ्यालाही बेड्या ठोकल्या. अल्ताफ गफार शेख (रा. सेवाग्राम), इक्बाल अकबरशाह पठाण व कुणाल विठ्ठल वांदिले (दोघेही रा. पवनी) असे सुपारी घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. जाम येथील कावेरी हॉटेलचा मालक अशोक अवघडे याने तिघांना हत्या किंवा घातपात घडविण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती दहेगाव (उजवणे) येथील हॉटेल व्यावसायिक श्यामसुंदर म्रांडवकर यांना मिळाली. त्यांना साईराम हॉटेलच्या बाजूला असलेल्या सर्विस सॅटरसमोर भेटण्यास बोलावले होते. त्यामुळे मांडवकर यांना धोका असल्याचे लक्षात येताच त्यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक रामदास खोत, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसराम यांच्यासह कर्मचारी जयपाल सूर्यवंशी, विक्की मस्के, अनिल वाघमारे, समीर कुरेशी हे मांडवकर यांना सोबत घेऊन भेटीसाठी ठरविलेल्या स्थळाकडे रवाना झाले. सापळा रचला असता अल्ताफ शेख, इक्बाल पठाण व कुणाल वांदिले हे तिघेही पांढऱ्या रंगाच्या कारजवळ उभे दिसून आले. मांडवकर त्यांच्या जवळ गेले असता तिघेही त्यांना कारमध्ये बसण्यास जबरदस्ती करू लागले. त्यामुळे लागलीच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये लोखंडी सुरा आढळून आला. तसेच अशोकने श्यामसुंदर यांना मारण्यासाठी एक लाखात सुपारी दिल्याचेही कबुली दिली. यावरून पोलिसांनी अवघडेसह चौघांनाही अटक करून त्यांच्याकडून एमएच 3२ एएच २४७८ क्रमांकाची कार जप्त केली.