
हिंगणघाट : शहरातील संत तुकडोजी वॉर्ड परिसरातील कुलूपबंद असलेल्या सात घरांना चोरट्यांनी लक्ष्य बनवून हात साफ केला. ही घटना शनिवारी रात्री घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
संत तुकडोजी वार्ड परिसरातील उमेश उत्तमराव फुलकर, दीपक लेखराम गायधने, सिद्धार्थ गायकवाड, बिलास झाडे, वाघमारे व परबत अशा सहा व्यक्तींच्या घरी चोरट्यांनी डल्ला म्रारला. हे सर्व रहिवासी आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन ते कुलूपबंद होते. कुलूपबंद असल्याचे पाहूनच चोरट्यांनी आपला डाव साधला,
याप्रकरणी तिघांनीच पोलिसांत तक्रार केल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी या सर्वांच्या घराचे कुलूप तुटून दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यात उमेश फुलकर व दीपक जायधने यांच्या घरातील साडेसात हजार रुपये रोख, सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडील सोन्याची पोत, कानातले झुमके असा एकूण 3८ हजारांचा मुद्देमाल, विलास झाडे यांच्या घरातील दोन घड्याळासह ८ हजार ४०० रुपयांचे साहित्य पळविल्याची माहिती मिळाली. एकाच रात्री सात घरे फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकाची चमू या चोरट्यांच्या मागावर असून हे चोरटे नागपूर येथील सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.