

वर्धा : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तर वर्धा जिल्ह्यातील सेलू आणि सेवाग्राम भागातून जनावर चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक करण्यात सेवाग्राम पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांनी तीन ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रशांत अशोक सोमनकर (३०), फिरोज नूर शेख (3२) दोन्ही रा. कान्होलीबारा तर राहुल रामचंद्र कोहळे (३२) रा. पुलफैल वर्धा, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधून असलेले दोन बैल चोरून नेल्याची तक्रार शेतकरी विशाल अशोक फुलझेले रा. बरबडी यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनीही शेतकऱ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्ह्याची नोंद घेऊन तपासाचे चक्र फिरविले. दरम्यान, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारें सापळा रचून या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा, वर्धा जिल्ह्यातील सेलू आणि सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जनावरे चोरल्याची कबुली दिली.
या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीची जनावरे तसेच चोरीच्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा एम.एच. ४० बी.एल. ८९२२ क्रमांकाचा मालवाहू वाहन जप्त केले आहे. ही कारवाई सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, हरिदास काकड, गजानन कठाणे, जयेश डांगे, पवन झाडे, अभय आगळे, सायबर सेलचे अक्षय राऊत यांनी केली.