
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) बारा वर्षे पूर्ण झाली. तरीसुद्धा या हत्येतील मुख्य सूत्रधार व मास्टरमाईंड यांच्याविरोधात चौकशीसुद्धा झालेली नाही, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि शहिद डॉ. दाभोळकरांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळी निर्भय माॅर्निंग वाॅक चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. यावेळी राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे यांनी प्रबोधनपर गीताने वाॅकची सुरुवात केली. त्यानंतर कार्यकर्ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुतळा, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जेल रोड असा मार्गक्रमण करीत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले.
या वाॅकमध्ये लोकशाही अभियानचे प्रमुख पदाधिकारी अतूल शर्मा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, जिल्हा विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह सुनील ढाले, महिला विभागाच्या कार्यवाह द्वारकाताई ईमडवार, जिल्हा प्रधान सचिव भरत कोकावार, शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे जिल्हा कार्यवाह दिलीप गुळघाणे, वरिष्ठ कार्यकर्ते अशोक हेडावू आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.




















































