वर्ध्याच्या खडकी येथे कारचा भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू, एक जखमी ! मृतकांमध्ये दोन महिला, पंचवीस वर्षीय युवकाचा समावेश

वर्धा : वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी नजीक तुळजापूर-नागपूर मार्गावर सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीजवळ शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला व एका पंचवीस वर्षीय युवकाचा समावेश असून ते सर्व वर्ध्यातील जुनघरे कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. 43 बी. एन. 1986 क्रमांकाच्या कारने चौघे जण वर्ध्याकडून नागपूरच्या दिशेने जात होते. खडकी-आमगाव फाटा दरम्यान कारचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकावर आदळून समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की कार रस्ता ओलांडून थेट कडेला असलेल्या झुडपात घुसली.

या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून सिंदी पोलीस ठाण्यात याची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here